पाचोरा (प्रतिनिधी) – सोशल मीडियातील सुंदर मुलींचे फोटो नवरदेवाकडील मंडळींना दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या तथाकथित भोंदू महाराजचा पर्दाफाश झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पळासखेडे गुजराचे या गावातील आरोपी राजेश्वर नारायण पाटील असे संशयित आरोपीचे नाव असून त्याचा लग्न जमविण्याचा धंदा आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजराचे या गावातील संशयित आरोपी राजेश्वर नारायण पाटील हा लग्न जमविण्याचे काम करतो . पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील याला व्हाट्सअपवरून एका मुलीचा फोटो टाकला आणि तुला ही मुलगी पसंत पडली तर तुझा विवाह या मुलीशी लावुन देतो असे सांगून नवरदेव मुलाकडुन तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये रोख, मुलीचे दागिने आणि अजुन एका मध्यस्थीला देण्यासाठी घेतले . नवरी घेऊन येतो असे आरोपीने विश्वासाने सांगितले म्हणून दुसखेडा येथे दि. २२ जुन २०२१ रोजी चि. रविंद्र चा विवाह सोहळाचे आयोजन करण्यात आले . ठरल्या प्रमाणे हळद लावली गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न जमविणार्या बहाद्दरने मोबाइल स्विच ऑफ करुन टाकला. विवाह साठी आलेल्या वर्हाडी नवरीची वाट बघुन थकुन गेले. तेव्हा हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले. आरोपी राजेश्वर हा फसवणूक करुन फेसबुकचे मुलींचे फोटो डाऊनलोड करून अशाच प्रकारे फसवणूक करीत आहे त्याच्या विरोधात पाचोरा पोलीसात भादवी ४२० प्रमाणे गुन्हा दाखल आज दि. ४ जुलै रोजी दुपारी करण्यात आला आहे. आरोपी पोलीसांच्था ताब्यात होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.






