मुंबई (वृत्तसंथा) – मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे तरुण आंदोलन करत आहे. मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सरकारने माजी मुख्यमंत्री विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे. या उपसमितीच्या अध्यक्षपदी चव्हाण यांची नियुक्ती केल्याने भाजप नेते खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विरोध केला आहे. या उपसमितीच्या अध्यक्षपदावरून चव्हाण यांची हकालपट्टी करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.
विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली असूनही प्रत्यक्षात नियुक्ती पत्र न देण्यात आल्याने संतापलेल्या मराठा तरुणांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज ३६ वा दिवस आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज या तरुणांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षतेपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आज दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक होती. मात्र २ वाजता विधानसभेत लक्ष्यवेधी असल्याने ही बैठक ५ वाजता होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.