औरंगाबाद(वृत्तसंस्था : संचारबंदी असून घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी शहरात टवाळखोर तरुण याला जुमानत नसून त्याचाच प्रत्यय आज शहरात दिसून आला . विनाकारण ट्रिपल सीट फिरणाऱ्या तरुणांना हटकल्यावर त्यांनी आपल्या इतर स्थायीदाराना सोबत घेत वाहतूक पोलिसाला त्याच्याच काठीने बदडल्याची संतापजनक घटना येथे घडली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे .
संचारबंदी निमित्त औरंगाबाद शहराचं प्रवेशद्वार असलेल्या दिल्ली गेटजवळील अण्णा भाऊ साठे चौकात पोलिसांनी आज विशेष नाकाबंदी सुरू केली होती. आज दुपारी वाहतूक शाखेचे पोलीस जनार्दन जाधव आणि जोनावल हे दोघेही पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत नाकाबंदी करत होते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण ट्रिपल सीट येऊन त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. संचारबंदीत वाहने चालविण्यास मनाई असतानाही ट्रिपल सीट जात असलेल्या या दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या तावडीतून पळण्यात हे तिघेही यशस्वी झाले. मात्र धक्कादायकबाब म्हणजे थोड्यावेळाने हे तरुण तोंडाला मास्क लावून आणखी काही तरुणांना घेऊन साठे चौकात आले आणि त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
आम्हाला तुम्ही अडवलेच का? असा सवाल करत या तरुणांनी पोलिसांशी अरेरावी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना संचारबंदी लागू असल्याचं सांगतानाच वाहतूक नियम मोडल्यामुळेच तुम्हाला अडवल्याचं या तरुणांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका तरुणाने पोलिसाच्या हातातील काठी हिसकावून पोलिसांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना मारहाण सुरू झाल्याने महिला पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही हे हल्लेखोर थांबले नाहीत. पोलिसांवर लाठीहल्ला केल्यानंतर या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी या घटनेतील दोघांना अटक केली असून फिरोज फारुख हा यातील मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे औरंगाबादेत संतापाची लाट पसरली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.