मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार पाहायला मिळाला. साधारण दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजारापर्यंत विकलं गेलं. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटकही केली. पण आता कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटना स्पष्ट केलं आहे.
कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघनेनं सांगितलंय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं लिहिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना WHO च्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, होय आम्ही Prequalification list मधून रेमडेसिव्हीर वगळले आहे. WHO कडून हा त्या देशांसाठी संदेश आहे, जे WHOच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करतात. WHO आता त्या देशांना रेमडेसिव्हीर घेण्याची शिफारस करत नाही’. त्याचबरोबर WHO ने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीरचा वापर करु नका, असा इशारा दिला आहे. कारण, गंभीर रुग्णांवरही रेमडेसिव्हीरचा कुठलाही परिणाम दिसून आल्याचे पुरावे नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे या इंजेक्शनची मागणीही मोठ्या प्रमाणात होत होते. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु होता. दीड हजाराच्या आसपास किंमत असलेलं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत विकलं जात होतं.
रेमडेसिव्हीरच्या काळ्या बाजाराचे अनेक प्रकार महाराष्ट्रात समोर आले होते. दरम्यान, कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर केला जाणार नसल्याचं आता WHO ने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यापूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिलेल्या रुग्णांकडून आता प्रश्न विचारले जाऊ शकतात.