जळगाव;- सद्यस्थितीत रासायनिक खतांच्या किमती बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसताना दुसरीकडे रासायनिक खतांची किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रासायनिक खतांच्या किंमती पूर्ववत ठेवाव्यात. तसेच खतांवर दिली जाणारी सबसिडी वाढवून द्यावी आग्रही मागणी केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रासायनिक खते मंत्री सदानंद गौडा, रासायनिक खते राज्यमंत्री मनसुख मांडविय तसेच केंद्रीय सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्याकडे पत्राद्वारे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक शोषण होणार असून शेतमालाच्या किमती त्याच असताना, दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
गेल्या वर्षी लॉकडाउन मुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने, खत निर्मिती खर्चात वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्याने खतांच्या किमती वाढल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी आपला देश कृषीप्रधान देश असल्याने बळीराजा जगला पाहिजे त्याला सर्वतोपरी मदत केंद्राकडून झाली पाहिजे या भावनेने रासायनिक खतांच्या झालेल्या दरवाढीबाबत केंद्राने फेरविचार करावा व रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत ठेवाव्यात. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे
येत्या आठवड्याभरात खतांच्या किमती कमी होतील अशा हालचाली केंद्राने वेगात सुरू केल्या असुन रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती येत्या आठवडाभरात निश्चितच कमी होतील. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, केंद्र सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, येत्या आठवड्यापर्यंत खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे.