जळगाव ;-तालुक्यातील कुसुंबा येथे आज दुपारी कुठल्यातरी धारदार शस्त्राने येथे वास्तव्याला असलेल्या दांपत्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

याबाबत वृत्त असे की, कुसुंबा शिवारातील कॉलनी परिसरात रहिवासी असणारे मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशा मुरलीधर पाटील दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास आढळून आले. यापैकी आशा मुरलीधर पाटील (वय ४७) यांचा मृतदेह तळ मजल्यावरील मागच्या रूममध्ये आढळून आला आहे. तर त्यांचे पती मुरलीधर राजाराम पाटील (वय५४) यांचा मृतदेह हा वरील मजल्यावरच्या रूममध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही पती-पत्नीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असून यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान, हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला की, कुणी चोरीच्या उद्देश्याने घरात येऊन त्यांचा झटापटीत खून केला याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. तसेच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलीस तपास करीत आहे . दरम्यान या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.







