नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वेगाने वाढ होत आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमती 100 रुपये प्रति लीटरजवळ पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकार या किंमती कमी करण्यावर नाही, तर नव्या पर्यायांचा विचार करत आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी देशात पर्यायी इंधनांना प्राधान्य देत मंगळवारी म्हटले आहे की देशात आता पर्यायी इंधने वापरण्याची वेळ आली आहे.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे की देशात आधीच्या तुलनेत 81 टक्के लिथियम-आयर्नच्या बॅटरी तयार होत आहेत. सोबतच हायड्रोजन फ्यूएल सेल तयार करण्याचा प्रयत्नही सरकार करत आहे. त्यामुळे आता पर्यायी इंधनांकडे पाहण्याची वेळ आली असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. लिथियम आयर्न बॅटरीच्या क्षेत्रातही सध्या चीनसारख्या देशांचे वर्चस्व आहे, मात्र भारतही या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे.
सध्या भारत 8 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करत आहे. गडकरी यांनी म्हटले आहे की जागतिक बाजारात जीवाश्म इंधनाची किंमत वाढते आहे आणि भारतात 70 टक्के जीवाश्म इंधन आयात होते. त्यांनी सांगितले की नुकतेच जैव-सीएनजीने चालणारा ट्रॅक्टर सादर केला गेला. यात इंधन म्हणून पिकाचे राहिलेले भाग, उसाचे राहिलेले भाग, कापसाच्या पिकाचे वाया गेलेले भाग यांचा वापर केला जाऊ शकतो. ते म्हणाले, ”पर्यायी इंधन उद्योग वेगाने पुढे नेण्याची गरज आहे आणि तामिळनाडू हे कृषीक्षेत्रातले एक महत्वपूर्ण राज्य आहे.”
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले की राज्य सरकारांनी कृषी अवशेषांपासून इंधन तयार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यातून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करावे. फास्टॅग अनिवार्य करण्याची कालमर्यादा वाढवण्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, ”यात काहीही बदल होणार नाही.” सर्व वाहनांसाठी टोलनाक्यांवर सध्या फास्टॅगद्वारे भुगतान करणे अनिवार्य करण्यात आले आहे.







