नागपूर (वृत्तसंस्था ) ;- मानसिक तणावातून नागपुरात एका वकिलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संतोष नीलकंठ कन्नाके (45) असे आत्महत्या करणाऱ्या या वकिलाचे नाव आहे. ते चंद्रपूर जिह्याच्या वरोरा येथील रहिवासी असून, नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. आत्महत्या करणारे वकील संतोष नीलकंठ कन्नाके यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती, मात्र अपत्य होत नसल्याच्या कारणाने त्यांना मानसिक त्रास व्हायला लागला होता. काल त्यांनी स्वयंपाकघरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतक संतोष कन्नाके यांची पत्नी शोभा या शिकवणी वर्ग घेतात. त्या मुलांना शिकवण्यासाठी सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. त्या जेव्हा घरी परतल्या तेव्हा त्यांना संतोष हे गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.








