मुंबई (वृत्तसंस्था) – पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते. पण, सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परिणामी संयम संपल्याने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते अपयशी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. यावर आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करत होते. मात्र, केंद्र सरकारने त्यांना गांभीर्याने न घेतल्याने आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यातही कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते त्यात अपयशी ठरल्याचेही पवार म्हणाले.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो. दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि कारवाईबद्दल राज्यातीन नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे.








