जळगाव (प्रतिनिधी ) ;- पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील वादग्रस्त ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन . पाटील यांनी काल काढले असून आज प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने कारवाई उद्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

सामनेर येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस. आर. पाटील यांच्या गैरकारभाराबाबत सामनेर येथील गोरख नेरपगार आणि प्रवीण पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती . यात त्यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस. आर. पाटील यांचे सामनेर गावाच्या विकासाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले असून विकासकामे झाली नसल्याचे म्हटले होते . त्यानुसार ग्रामपंचायतीचे ग्राम विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली होती . तसेच वरील दोन्ही तक्रारदारांच्या जबाब घेतला असता दोघांनी एस. आर. पाटील हे २०१६ पासून गावात कार्यरत होते . या तक्रारीत सरपंच किंवा सदस्यांना विश्वासात न घेता कोरे प्रोसेसिडिंगवर ,चेक, नावे व्हाउचर्स आदींवर सह्या घेणे , हिशेब मागितल्यास अरेरावी करून भांडण करणे, . शासकीय कामात अडथळा आणता म्हणून ३५३ दाखल करण्याची धमकी देणे ,महिलाची ग्रामसभा न घेणे, अंदाज पत्रकांची तांत्रिक मान्यता न घेणे, कर्मचारी सूची वेतनमान नोंदवही, लेखापरीक्षण अहवाल न देणे , साहित्य खरेदी करताना कोटेशन न सादर करणे , नोंदवह्या अपूर्ण ठेवणे , ग्रामपंचायत सदस्यांचा कर भरणा न करणे यासह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले असून तत्कालीन सरपंचासह मिळून २ लाख ८३ हजार ३४३ रुपयांच्या अपहाराचा गंभीर ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे सीईओ डॉ. बी. एन . पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी एस. आर . पाटील यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारल्याने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली असून बुधवार २७ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्यावर निलंबनाच्या होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले आहे .
मी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश -प्रवीण पाटील ,माजी उपसरपंच
तत्कालीन सामनेर येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर . पाटील यांच्या कारनाम्यांची जंत्री जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेकडे करूनही निलंबनाची कारवाई होत नसल्याने माजी उपसरपंच प्रवीण पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा ईशारा दिला होता . मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून आश्वासन मिळाले . तसेच सीईओ डॉ. बी. एन . पाटील यांनी काढलेल्या निलंबनाच्या आदेशाने उशिरा का होईना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया माजी उपसरपंच प्रवीण पाटील यांनी ‘केसरीराजशी ‘बोलताना व्यक्त केली.







