यावल ;- तालुक्यातील किनगाव येथील शेतात एका महिलेवर चाकू हल्ला करून पलायन केलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील किनगाव येथे एका व्यक्तिने शेतात काम करणार्या महीलेवर चाकुहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी घडली होती. आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतात काम करणार्या एका २८ वर्षीय महीलेवर चंद्रकांत वसंत खलसे याने चाकुने वार करून गंभीर जखमी केले होते. यानंतर त्याने घटना स्थळावरून पलायन केले होते.

पोलिसांनी खलसेचा तपास सुरू केला होता. यानंतर मात्र चंद्रकांत वसंत खलसे (वय ४५ वर्ष ) या शेतमजुरी करणार्याने त्याच हनुमागडी आडगाव शिवारातील विनय पाटील यांच्या शेतातील विहीर उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आज त्याचा मृतदेह आढळून आला. सकाळी मजूर शेतात गेले असता त्यांना खलसेचा मृतदेह दिसला.







