अमळनेर ;- अमळनेर नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा उपक्रमात शहरात विजेवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी मोफत चार्जिंग करण्याचे 5 केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एका केंद्राचे उदघाटन आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते आज प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगरध्यक्षा पुष्पलता पाटील , माजी नगरध्यक्षा जयश्री पाटील , माजी उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे , जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी प्रांताधिकारी सुनील सूर्यवंशी, डीवायएसपी राकेश जाधव , तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील , नगरसेवक मनोज पाटील , प्रवीण जैन , एपीआय एकनाथ ढोबळे हजर होते.
माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धन , प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी विजेवर चालणारी वाहने वापरण्यास प्रवृत्त व्हावे, म्हणून शहरातील विविध चौकात चार्जिंग केंद्रे लावण्यात येणार आहेत. एका केंद्राची किंमत दीड लाख रुपये आहे. विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी कमी खर्चात चार्जिंग केंद्र तयार केले आहे. एका केंद्रांवर एकावेळी 2 वाहने चार्जिंग करण्यात येतील. एका वाहनांसाठी सुमारे 40 मिनिटे लागणार आहेत. नागरिकांसाठी चार्जिंग व्यवस्था मोफत राहणार आहे. एकदा चार्जिंग केल्यावर वाहन 40 ते 50 किमी चालेल. त्यासाठी 4 ते 5 युनिट खर्च होतात. पालिकेने मोफत चार्जिंगची व्यवस्था केल्याने नागरिकांच्या खर्चात बचत होणार आहे.सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले.