नवी दिल्ली( वृत्तसंस्था ) ; – जगभरात करोनाची लस अंतिम टप्प्यात पोहचली असून काही देशांनी लसीकरणाची मोहीम सुरूही झाली आहे. परंतु, जगातून करोनाचे समूळ उच्चाटन होणे अशक्य आहे, असा इशारा जागतिक आरोग्य परिषदेने (WHO) दिला आहे.
करोना विषाणूच्या नव्या ‘स्ट्रेन’बाबत चर्चा करण्यासाठी डब्लूएचओने तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. मात्र, सविस्तर चर्चा करण्यासाठी ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे.
या बैठकीत डब्लूएचओने जगाला गंभीर इशारा दिला आहे. करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसी विकसित झाल्या असल्या तरीही जगभरातून करोना विषाणूचे समूळ उच्चाटन ही अशक्य बाब आहे. विषाणूला पायबंद घालण्यासाठी आगामी १०० दिवसात सर्व देशांनी लसीकरण मोहीम राबवावी, आशाही डब्लूएचओने व्यक्त केली आहे.
दरम्यान, वर्ल्डमिटर वेबसाइटनुसार, गेल्या 24 तासांत अमेरिकेत करोनाचे 2 लाख 16 हजार 138 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार अमेरिकेत एकूण 2 कोटी 35 लाख 93 हजार 741 लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत करोनामुळे 3,722 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. ब्राझिलमध्ये गेल्या 24 तासात 61 हजार 822 लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. तर, 1 हजार 283 लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासांत 22 हजार 850 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 566 लोकांचा मृत्यू झाला आहे.