पुणे (वृत्तसंस्था) – जादा व्याजदर देण्याच्या आमिष दाखवत दाम्पत्याला तब्बल ६५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तर आणखी ३४ जणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. एकाला अटक केली आहे.
याप्रकरणी पंकज भागचंद छल्लाणी (रा, पुणे ) याला अटक केली आहे. तर रिचर्ड अंची (वय ५८, रा. भोसलेनगर )यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०२१ कालावधीत घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज व रिचर्ड यांची मित्राकडून ओळख झाली होती. त्यानंतर पंकजने रिचर्डसह त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादित केला. त्यांना जादा दराने व्याज देण्याच्या आमिषाने गुुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार रिचर्ड यांनी पंकजच्या सांगण्यानुसार ६५ लाखांची गुंंतवणूक केली. त्यानुसार पंकजने फेब्रुवारी २०१८ पर्यंत त्यांना व्याज दिले. मात्र, मार्च २०१८ पासून व्याज आणि ठेव परत न देता फसवणूक केली. त्याशिवाय पंकजने ३४ नागरिकांना १८ ते २४ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी दिली.