मुंबई (वृत्तसंस्था) – ‘ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावे. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. मला त्यांच्या भाषेत, संस्कारात पडायचे नाही,’ असे प्रत्युत्तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिले आहे. ते मुंबईत वार्ताहरांना बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, ‘ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचे श्रीखंड करण्यात गुंतलेले सरकार. मी यापूर्वी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढलेला. संजय राऊत यांनी स्पष्ट ऐकावे, जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली तीच जमीन ९०० कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी महापालिका निघाली आहे. त्यातील ३५४ कोटी देण्यात आले आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.
‘पुरवण्यांशिवाय मी बोलत नाही हे मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचं आहे. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही. म्हणून शिवीगाळ करतात. दहिसर घोटाळ्याची सगळी कागदपत्रे असून, मुंबई लोकायुक्ताकडे तक्रार दिली आहे ती दाखलही झाली आहे. मी आणखी नऊ सातबारा उतारे सादर करत आहे. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. ३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झालेत. त्यातील ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत झाले असल्याचा’ दावा किरीट सोमय्या यांनी केला.
‘किशोरी पेडणेकर यांच्याबाबत पुरावे देऊनही उद्धव ठाकरेंनी कारवाई केली नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करावी. मी दिलेली कागदपत्रे चुकीची असतील तर जेलमध्ये टाका. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. शिवसेनेत हिंमत असेल तर सोमय्याला हात लावून दाखवा,’ असे आव्हान किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला दिले आहे.







