मुंबई (वृत्तसंस्था) – येथील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा वापरला म्हणून हॉटेल मालकास कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवी मुंबईत तुर्भे परिसरात बिस्मिल्लाह हॉटेलमध्ये मनसेचा राजमुद्रा असलेल्या झेंडा वापरलेला होता. हॉटेलच्या एका भिंतीवर पूर्वी लावलेले मेनूचे पोस्टर झाकण्यासाठी हॉटेलचालकाने राजमुद्रा असलेला मनसेचा झेंडा लावलेला होता. नॉन व्हेज हॉटेल असताना राजमुद्रा असलेला फोटो का वापरण्यात आला, असा प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. आपल्याला राजमुद्रा काय आहे हे माहिती नाही म्हणून झेंडा वापरल्याचे यावेळी हॉटेलचालकाने सांगितले.
मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलचालकास चोप दिला. त्यानंतर हॉटेलचालकास उठाबशा काढायला लावत माफी मागायला लावली. मग हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर लावलेला मनसेचा झेंडा व्यवस्थित काढून घेतला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला.
दरम्यान, जानेवारी महिन्यात पक्षाच्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी पक्षाचा नवा झेंडा लाँच केला होता. तेव्हा राज ठाकरे यांनी राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा कसलाही अवमान होणार नाही, अशी ताकीद कार्यकर्त्यांना दिली होती. तथापि, झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यावरून अनेकांनी मनसेवर टीका केली होती.







