सटाणा (वृत्तसंस्था) – औरंगाबाद येथील सिडको महामंडळाच्या कार्यालयात लिपीक पदावर नोकरीला लावून देतो असे अमिष दाखवून दोन लाख रुपये उकळणा-या ठगाला सटाणा पोलीसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमनाथ पवार याला १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, सोमनाथ पवार ( वय ४२) रा लोहणेर ता.देवळा याने बागलाण तालुक्यातील केरसाणे येथिल दिलीप सुकदेव मोरे यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेवून तुमच्या मुलाला औरंगाबाद येथील सिडको महामंडळाच्या कार्यालयात लिपीक म्हणून नौकरी ला लावून देतो या साठी त्यांचा कडे आठ लाखाची मागणी केली व टोकन म्हणून दोन लाख रुपये सन २०१६ मध्ये घेतले होते.
आज काम होईल उद्या काम होईल असे अश्वासन देत तब्बल चार वर्षे टोपी लावून पैसे लुबाडणारा सोमनाथ पवार हा भुलथापा मारत होता अखेर आपली पैसे देवून फसवणूक झाली आहे.आपल्या मुलाला नोकरी लागणे शक्य नाही हे लक्षात येताच दिलीप मोरे यांनी पैशांंचा तगादा लावला व पोलीसात गुन्हा दाखल करायची धमकी दिली असता सोमनाथ पवार याने त्याच्या महाराष्ट्र बँकेचा चेक देवून थोडे दिवसात पैसे परत देतो असे सांगून वेळ मारून नेली होती. अखेर दिलीप मोरे यांनी या बाबत सटाणा पोलीसात धाव घेऊन रितसर सोमनाथ पवार याचा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यावेळी सटाणा पोलीसांनी तातडीने पावले उचलून सोमनाथ कृष्णा पवार याला अटक केली आहे.काल त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व पोलीस हवालदार रवी भामरे हे पुढील तपास करीत आहेत.







