आडगाव ता. एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे ढोली शिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांच्या अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दि. १७ रोजी शनिवारी संध्याकाळी ५. ३० वाजेच्या सुमारास घडली, या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी सायंकाळी ढगाळ वातावरण झाल्यानंतर जोरदार पाऊस व विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यात ढोली शिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या रविंद्र प्रभाकर महाजन (वय 22 ) व महेंद्र उखर्डू पाटील ( वय – २३) यांच्या अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही तरुण उखर्डू पाटील यांच्या शेतात कपाशी वेचणी साठी गेले होते .संध्याकाळी अनपेक्षित जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु झाला. हे वातावरण पाहून घरी येण्यासाठी तयारी करत असताना, झाडाखाली उभे असलेल्या रवींद्र महाजन व महेंद्र पाटील यांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचा मृतदेह कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असून, त्यांचे शवविच्छेदन बाकी असल्याचे डॉक्टर वाघ यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत अस्कमात मृत्यू नोंदविण्याचे काम सुरु होते. एपीआय श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.








