जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा, भडगांव तालुक्यातील गिरणा, तितूर व गडद या तीन नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आहेत. महसूल विभागाचे पथकामार्फत अवैध गौणखनिज वाहतुकीबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. परंतू सध्या या तीनही नदीपात्रात अधिकृत लिलाव देण्यात आलेले नसून अवैध वाहतुकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आता फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

उपविभागीय दंडाधिकारी यांनी दि. १५ ऑक्टोंबर रोजी सकाळ पासून ते दि. १४ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाळू वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील बांबरुड खु. पुनगांव, माडकी, ओझर, अंतुर्ली बु. प्र.पा. भातखेडे खु. परधारडे, बहुळेश्वर, दुसखेडे, कुरंगी, माहिजी, वरसाडे प्र.बो. बाळद बु. नाचणखेडे, होळ, सांगवी बु.प्र.भ. घुसर्डी बु. प्र.भ. वडगाव खु. प्र.भ. व पिंप्री बु. प्र.भ तसेच भडगाव तालुक्यातील भडगाव, सावदे, टोणगाव बांबरुड प्र.उ. गिरड, कराब, वडदे, टेकवाडे, वाडे, पिंपळगाव बु. भट्टगांव, अंतुर्ली बु. भातखंडे बु. नावरे , बाळद खु. गिरड व कोठली या गावातील गिरणा, तितूर व गडद नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरील गावातील गिरणा, तितूर व गडद या तीन नदीच्या पात्रात वाळू वाहतुक, उत्खनन करणा-या (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करीत आहे. कोणत्याही व्यक्तीने वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचेविरुध्द भारतीय दंडसंहिता 1860 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरचा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन तसेच सदर क्षेत्रात वाहनास प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिका-याने परवानगी दिलेल्या वाहनास लागू होणार नाही, असे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.







