जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात सोमवार दि. ५ रोजी पासून दर सोमवारी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ओपीडीचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.
पोस्ट ओपीडीचा फित कापून चतुर्थश्रेणी कर्मचारी दिलीप पुंडलिक महाजन यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, कोरोना महामारीची लढाई सर्वांची असून सामान्य रुग्णालयामध्ये सर्व वर्गाच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबाप्रमाणे राहून हि लढाई जिंकायची आहे. पोस्ट कोविड सेवेमुळे कोरोना जिल्ह्यातून बाहेर काढू असा आशावाद डॉ. रामानंद यांनी व्यक्त केला.
आजारातून बरे झालेल्यांचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९० टक्कयांवर आले आहे. कोरोना मधून बरे झाल्यानंतर अनेक नागरिक हे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत असतात. अनेकांना धाप लागणे, लवकर दमणे, अंगावर चट्टे उठणे आदी लक्षणे जाणवून येतात. त्यामुळे कोरोनोत्तर ओपीडी सुरु करण्यात येत आहे. येथील डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. पोस्ट कोविड ओपीडी विभागात डॉ. विनय पंचलवार, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. एन.एस. महाजन यांची नियुक्ती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली आहे. शुभारंभावेळी उपाधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. विजय गायकवाड आदी उपस्थित होते. पोस्ट कोविड ओपीडी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केसरीराजच्या माध्यमातून केले आहे.