जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर येथील शेतकरी ऍग्रो सेंटरचे संचालक व्यापारी राजू धोंडू पाटील यांना जांभूळ गावी घराकडे जात असताना संशयित आरोपींनी मोटरसायकलचा पाठलाग करून डोळ्यात मिरची पावडर टाकून सोबत असलेली दुकानाची रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला.
पहूर येथील व्यापारी राजु धोंडू पाटील नेहमीप्रमाणे आपलं दुकान बंद करून तिथून जवळच असलेल्या जांभूळ या गावी घराकडे जात असताना दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रमांक (एम. एच. १९ सीई 67 61) जात होते. त्यांच्यासोबत असलेला अविनाश संजय पवार रा. जांभूळ हे निघाले होते. त्यांच्याजवळ दुकानाचे दिवसभराचे वीस हजार रुपये रोख रक्कम सोबत होती. दुचाकीवर हिवरखेडा मार्ग जात असताना एक मोटर सायकल पाठलाग करत असल्याचे दिसले. त्यासाठी व्यापारी राजू पाटील यांनी दुचाकी हळू केली. त्यावेळी पाठलाग करणारी दुचाकी देखील कुठेतरी पिंपळगाव तांडा येथे गेली असल्याचे वाटले. मात्र पुढे कमानी तांडा शिवारात अज्ञात दुचाकीने रात्री साडेनऊ सुमाराच्या समोरून येत एकाने व्यापारी राजू यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. राजू पाटील यांनी दुचाकी मागे वळवून पळण्याचा प्रयत्न केला मात्र एकाने खिशातून बळजबरीने १ हजार रुपये काढले. तसेच दोघांनी माझ्या हातातील २० हजार रुपये असलेली बॅग घेऊन पळण्याचा प्रयत्न केला.
दुचाकीच्या प्रकाशात पहिले असता काळ्या रंगाची पल्सर वाहन, त्याला नंबर प्लेट नव्हती, हे दिसले. जांभूळ गावात विष्णू चव्हाण व योगेश राठोड हे दोन ग्रामस्थांना घडलेली घटना कथन केली. व्यापारी राजू यांनी योगेश राठोड यांच्या रिक्षाने पिंपळगाव गावी गेले. सुमारे अर्ध्या तासाने सोबत आलेल्या योगेश राठोड यास फोन आला की, पल्सर मोटरसायकल भरधाव वेगात पिंपळगाव बुद्रुककडे निघाली आहे. लगेच मराठी शाळेजवळ असलेले राजू पाटील यांचे नातेवाईक अमोल देशमुख, संतोष देशमुख, समाधान देशमुख, राजू पाटील,अमोल पाटील रस्त्यावर उभे राहून येणारे मोटरसायकल थांबवली. पहूर पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. तात्काळ पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, ज्ञानेश्वर ढाकणे, कॉन्स्टेबल भरत लिंगायत घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना तात्काळ रंगेहात पकडण्यात आले असून पहूर पोलीस ठाण्यात राजू धोंडू पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत कडुबा चौधरी, गोपाळ सुखदेव भिवसने, चेतन प्रकाश जाधव या आरोपींविरोधात 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, भरत लिंगायत ज्ञानेश्वर बाविस्कर हे करीत आहे.