जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेमध्ये लवकरच खांदेपालट होणार असल्याची चर्चा शहरात आणि शिवसेनेच्या गोटामध्ये सुरू झालेली आहे. विरोधी पक्षनेता म्हणून नितीन लढ्ढा यांचे नाव समोर येत आहे. तसेच महापालिकेमध्ये गटनेता म्हणून अनंत जोशी यांच्या ऐवजी विष्णू भंगाळे किंवा इतर पर्यायांची शिवसेना चाचपणी करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीमधून शिवसेनेचे विष्णू भंगाळे हे निवृत्त झाले. त्यांच्या जागी पक्षातर्फे प्रशांत नाईक यांची स्थायी सदस्य म्हणून निवड झाली. स्थायी समिती सदस्यपदी शर्यतीत सुनील महाजन,अनंत जोशी हे देखील होते. मात्र ऐन वेळी ही नावे मागे पडून प्रशांत नाईक यांना संधी देण्याचे वरिष्ठ पातळीवरून ठरले. त्यानुसार प्रशांत नाईक आता पुढील स्थायी समितीमध्ये सदस्य राहतील. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये दोन वर्षांपासून विरोधी पक्षनेता असलेले शिवसेनेचे नगरसेवक सुनील महाजन यांचा कार्यकाळ प्रभावी ठरलेला नाही, असा सूर शिवसेनेच्या गोटात उमटू लागल्यानंतर आता त्यांच्या जागी सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून पक्षाकडे अभ्यासू ज्येष्ठ आणि संयमी तसेच मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले नितीन लढ्ढा यांचे नाव आहे. आगामी काळात शिवसेनेचे विरोधी पक्षनेते म्हणून महापालिकेमध्ये आक्रमकपणे व अभ्यासूपणे विषय मांडून जळगावच्या प्रश्नांवर प्रशासन व सत्ताधाऱ्यांशी भांडतील असे चित्र दिसू शकते.
सुनील महाजन यांनी प्रश्न मांडले पण पाठपुराव्यात ते कमी पडले असे बोलले जात आहे. त्यामुळे सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून नितीन लढ्ढा यांचे नाव आहे. तसेच गटनेते असलेले अनंत जोशी यांच्या जागी विष्णू भंगाळे तसेच इतर पर्यायाचा पक्ष विचार करीत असल्याची देखील माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर एकनाथराव खडसे यांच्यासोबत पक्षांतर करताना शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार असल्याची अफवा उठल्यामुळे पक्ष वरिष्ठ पातळीवर कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची तपासणी करीत आहे.