मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला होता त्यावेळी भाजप नेते यांनी कंगनाला पाठिंबा देत शिवसेनेवर टीका केली होती.
याचदरम्यान कंगना भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र कंगनाने आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही, असा खुलासा केला आहे.
वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कंगना हे प्रकरण या सरकारने वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. यांनीच तसे बनविले. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे.
ते पुढे म्हणाले, तिला राजकारणात येण्याचा कल नाही.काय प्रतिमा राहिली सरकारची? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.’ असेही ते वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.