गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी) – गेल्या पंधरवड्यापासूनच कांद्याच्या भावात थोडी,थोडी वाढ होत होती म्हणून कांदे उत्पादक शेतकरी आनंदीत व समाधानी दिसून येत होते.हा आनंद जास्त काळ न टिकता अल्पसा आनंद मिळाला केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर बंदी लावण्याचा तुघलकी निर्णय घेतल्याने कांदे उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून हा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी कांदे उत्पादक शेतकरी किसन माळी,प्रशांत संतोष पवार यांनी व उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून उन्हाळी हंगामातील कांदयाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते.म्हणून काही शेतकऱ्यांनी मातीमोल भावामध्ये कांदा विकून टाकला तर काही शेतकऱ्यांनी कांदयाला पुढे भाव मिळतील या आशेवर थांबत कांदा चाळमध्ये ठेवून मोठा खर्च केला आणि आता गेल्या पंधरवड्यापासून कांदयाला थोडी-थोडी वाढ होत गेली म्हणून मोठी आशा लागली होती आता याआठवडा भरापासून कांदयाला २२ते२५रुपये किलो असा बरा भाव मिळत असतांना कांदा तेजीत येईल अशा आशा व कांदयासाठी झालेला खर्च निघून हाती दोन पैसे मिळतील म्हणून उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा तुघलगी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरुन आनंदाचा चुराडा केला आहे म्हणून शेतकरी संतप्त झाले आहेत म्हणून केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय दयावा अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.









