जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील जिल्हा नियोजन समितीला कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ३३ टक्के निधीतील ५० टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याची नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मागणीला मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राज्यातील कोविड १९ चा प्रतिकार करण्यासाठी रुग्णांना लाभ होणार असून जिल्ह्यातील कोविड १९ साठी तब्बल ६१ कोटी खर्च करता येणार असल्याने कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांना वाढीव निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या संदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १४ एप्रिल २०२० रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२०-२१ च्या अंतर्गत उपलब्ध होणार्या ३३ टक्के तरतूदी पैकी २५ टक्के निधी हा कोविड-१९ विषाणूवरील उपाययोजना आणि सार्वजनीक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी राखीव करण्यात आला होता. २९ मे २०२० रोजीच्या पत्रकान्वये याला खर्च करण्याची मंजुरी देखील देण्यात आली होती.
दरम्यान, कोरोनाचा प्रकोप वाढत असल्यामुळे ३३ टक्क्यांमधील २५ टक्के रक्कम ही अपूर्ण पडत असल्याने राज्य शासनाने ही मर्यादा वाढवावी अशी मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली होती. या मागणीला राज्य मंत्रीमंडळाच्या नुकत्याच ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२०-२१च्या अंतर्गत उपलब्ध होणार्या ३३ टक्के तरतूदी पैकी ५० टक्के निधी हा कोविड-१९ विषाणूवरील उपाययोजना आणि सार्वजनीक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी वापरण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील वाढलेल्या कोविड-१९ विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जिल्हा नियोजन समितीला आरोग्य विषयक सुविधांसाठी अतिरिक्त निधी खर्च करण्याची मंजुरी मिळाल्याची बाब ही लक्षणीय असून याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. अर्थात यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी केलेली मागणी कारणीभूत ठरली आहे.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या या शासन निर्णयाचा राज्यासह जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी उपयोग होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठीचा अर्थसंकल्पीत तरतूद ३७५ कोटीच्या ३३% म्हणजे १२३ कोटी ७४ लक्ष ९९ हजार निधी उपलब्ध होणार असून त्याच्या ५० % म्हणजे ६१ कोटी ८८ लक्ष निधी कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता खर्च करता येणार आहे.