नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून विमाननिर्मिती क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवू पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाने चाचणीचा पहिला टप्पा पार केला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे असे हे पहिलेच विमान आहे. पहिल्या टप्प्यात या विमानाचा विमानतळावरील वावर, उड्डाण, अवतरण यांची चाचणी धुळे विमानतळावर पार पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कॅप्टन अमोल यादव यांनी 1998 साली आपल्या थर्स्ट एअरक्राप्ट कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. पहिला प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्यामुळे नाउमेद न होता त्यांनी 2003 मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. 2009 साली त्यांनी मुंबईतील चारकोप येथे आपल्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमानाची निर्मिती सुरू केली. 2011 साली अर्ज करूनही नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) विमानाला मान्यता मिळण्यासाठी अनेक वर्षे गेली. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी या विमानाची नोंदणी होऊ शकली. दरम्यानच्या काळात मेक इन इंडिया प्रदर्शनामध्येही कॅप्टन अमोल यांनी विमानासह सहभाग घेतला होता.
कॅप्टन अमोल यांनी हे विमान कोणत्याही सरकारी मदतीशिवाय स्वबळावर तयार केले आहे. यासाठी त्यांनी आपले घरही गहाण ठेवले आहे. आतापर्यंत यावर 6 कोटींचा खर्च झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी दीड ते दोन कोटी रुपयांची गरज आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर विमान नियमित वापरासाठी सज्ज होईल. कॅप्टन अमोल यांनी 9 आसनी विमानही तयार करण्यास सुरुवात केली होती. पण आर्थिक अडचणींमुळे तो प्रकल्प थांबवावा लागला आहे.
विमानाच्या पहिल्या चाचणीमध्ये त्याचा विमानतळावरील वावर कसा आहे याची पाहणी करण्यात आली. विमान सरळ रेषेत चालू शकते का, १८० अंशामध्ये ते वळते का, वेगावरील नियंत्रण या बाबींची चाचणी करण्यात आली. तसेच उड्डाण आणि अवतरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ‘सर्किट’ चाचणी केली जाईल. या वेळी विमान उड्डाण करून आकाशात एक फेरी मारेल आणि पुन्हा ते विमानतळावर उतरवण्यात येईल. येथे विमानापेक्षा वैमानिकाचे कसब महत्त्वाचे ठरेल. नव्याने तयार झालेल्या विमानाचे उड्डाण करताना जोखीम असते. त्यामुळे ही जबाबदारी कॅप्टन अमोल स्वत: घेणार आहेत.







