जळगाव (प्रतिनिधी) – एसटीबीए (स्टेशन तिकीट बुकिंग एजन्ट) यांच्याकडून गेल्या चार वर्षांपासून उत्पन्न कमी असून ही भुसावळ विभागाच्या डीसीएम यांच्याकडून टीडीएस घेतला जातो. मात्र तो आतापर्यंत एकदाही परत मिळाला नाही.

अथवा अधिकृतरित्या संबंधित विभागाकडे जमा पण केला नाही. तो परत मिळण्यासाठी एस.टी.बी.ए. यांनी रेल्वे संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित अधिकारी उडवा – उडवीचे उत्तर देऊन टीडीएस मिळण्यास दिरंगाई करत आहेत. त्यामुळे या एजंटांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे दाद मागत त्यांना निवेदन दिले आहे.
खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याकडे टीडीएस मिळण्याकरिता भाजपा युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुख भुषण जाधव यांनी हे निवेदन दिले. या निवेदनावर भुसावळ विभागातील सर्व एस.टी.बी.ए. यांच्या साक्षरी केल्या आहे. एस.टी.बी.ए. यांचा टीडीएसचा प्रश्न मार्गी लावू असे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सांगितले.







