श्रीनगर (वृत्तसंस्था) – जम्मू – काश्मीरमध्ये १५ ऑगस्टच्या अगोदरच्या दिवशी शुक्रवारी पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. श्रीनगरमधील नौगाम सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर १ कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत हल्ला झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. “नौगाम बायपासजवळ दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण यावेळी दोघे शहीद झाले. परिसर सील करण्यात आला आहे”.या अगोदर गुरुवारी श्रीनगरच्या शहीदगंज भागात दहशवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. या भागात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आणि लष्कराकडून संपूर्ण भागाला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. परंतु, अद्याप कोणताही दहशवादी सुरक्षा यंत्रणेच्या तावडीत आला नाही.







