जयपूर: राजस्थानातील अशोक गहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा कट रचल्याच्या कारणावरून राजस्थान पोलिसांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्रसिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना पक्षातूनही निलंबीत करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह आणि या आमदारांमध्ये पैशाचे व्यवहार होत असल्याची बाब टेलिफोन रेकॉर्डिंगमधून उपलब्ध झाली असून त्या अनुषंगाने सरकार पाडण्याचा कट रचल्याबद्दल त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सचिन पायलट यांच्या गटात या आमदारांचा सहभाग असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी राजस्थानचे पोलीस दल हे आमदार हरियानांतील ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले
आहेत तिकडे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
टेपमधील आवाज आपला नाही, आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस आमदारांना पैसे देऊन फोडून सरकार पाडण्याचा कट केल्याबद्दल राजस्थानातील व्यापारी संजय जैन यांना या आधीच अटक करण्यात आली आहे.







