जळगाव ( प्रतिनिधी) – रामानंदनगर पोलिस ठाण्यातील विश्वनाथ गायकवाड , रवी पाटील या कर्मचार्यांचेे वसुलीचे कारनामे नव्याने चर्चेत आले आहेत. शहरातील क्रेझी होम हॉटेल च्या मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने या दोघांनी व्यवस्थापनाची केलेली छळवणूक गाजत असतानाच त्यांच्या वसुलीच्या कारनाम्यांच्या उच्छादाची व्याप्ती किती मोठी आहे, हे आता उघडकीस येऊ लागल्याने त्यांना वरिष्ठ अधिकारीच अभय देत असल्याशिवाय हे दोघे स्वत: च्या बळावर एवढे धाडस करू शकणार नाहीत , अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी ५ फूट अंतर ठेवून खुर्च्या मांडलेल्या होत्या, सोशल डिस्टसिंगची पुरेशी काळजी घेतलेली होती तरीही रामानंदनगर पोलिसांना पैसे उकळण्याचे कारण हवे होते.
त्यामुळे पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी संशयाच्या गर्तेत सापडले आहेत. हे दोघे जिल्ह्यातील राजकारण्यांच्या पंटरांच्या आहारी जाऊन प्रामाणिक व्यावसायिकांनाही त्रास देत असल्याने जणू जिल्ह्यातील राजकारणीही आपल्या खिशात असल्याच्या थाटात ते धडाकेबाज वसुलीत गुंतलेले आहेत. क्रेझी होम हॉटेल च्या व्यवस्थापनाला त्यांनी दिलेला त्रास काडीबाज राजकीय पंटरांच्या कारस्थानांचा भाग असल्याचेही बोलले जाते आहे.
वरच्या मजल्यावर लिफ्टने जाणाऱ्यांना प्रवेश करताच नेमलेला स्वतंत्र कर्मचारी सॅनिटाईझ करून पाठवत होता.
क्रेझी होम हॉटेलच्या व्यवस्थापनाला रामानंदनगर पोलिस ठाण्यातील विश्वनाथ गायकवाड , रवी पाटील यांनी कसे वेठीस धरले त्याची ही कथाही थक्क करणारी आहे. 25 जूनरोजी या हॉटेलच्या दोन्ही मजल्यांवर दोन विवाह समारंभांचे आयोजन केलेले होते. दोन्ही मजल्यांचे आत व बाहेर जाणारे गेट वेगवेगळे आहेत. व्यवस्थापनाने आधीच प्रत्येक विवाहाला 50 पेक्षा जास्त लोक आत सोडले जाणार नाहीत याची काळजी घेतलेली होती. विवाहस्थळी ठेवलेल्या खुर्च्या 5 फूट अंतरावर ठेवलेल्या होत्या. आयोजकांनीच प्रत्येकासाठी मास्क व सॅनिटायझरची सोय केलेली होती. गेटवरच प्रत्येकाला सॅनिटायझ करून व मास्क लावून सोडले जात होते. त्याचवेळी यंत्राने प्रत्येकाच्या शरीराचे तापमानही मोजले जात होते.

हॉटेलच्या गेटवर विवाहासाठी आलेल्याना पूर्ण सॅनिटाईझ करून प्रवेश दिला जात होता.
चंद्रशेखर अग्रवाल हे या हॉटेलचे मालक आहेत. मोरया इव्हेंट्सचे संचालक सचिन सोनार यांनी या विवाहसोहळ्यांचे आयोजन केलेले होते. 25 जूनरोजी साडेअकरा ते बारा वाजेदरम्यान गायकवाड व रवी पाटील त्या हॉटेलमध्ये गेलेले होते. या विवाहसोहळ्यांच्या रितसर परवानगी बद्दल त्यांनी आधी चौकशी केली व व्यवस्थापकांना त्यानी रामानंदनगर पोलिस ठाण्यात येऊन भेटण्यास सांगितले होते. त्यांनी नोंदी तपासल्या तेव्हा 49 लोक मंगल कार्यालयात असल्याच्या नोंदी होत्या. चंद्रशेखर अग्रवाल व सचिन सोनार हे रामानंद पोलिस ठाण्यात जाऊन त्यांना भेटलेही. त्यावेळी गायकवाड त्यांना अत्यंत हलकटपणाने व एकेरी भाषेत जणू ते दोघे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत अशा भाषेत बोलत होते. हॉटेल सील करण्याची धमकीही त्यांनी दिली होती. पोलिस निरीक्षक आल्यावर बोलू असे सांगत त्यांना बराच वेळ बसवून ठेवले. पोलिस निरीक्षक आल्यावर त्यांनी त्यांना समन्स नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गायकवाड व पाटील यांनी त्यांच्याकडे 25 हजार रूपयांची मागणी केली होती. अखेरीस पाच हजारांत त्यांनी तडजोड केली. ते पाच हजार रूपये त्यांना डी. बी. रूम मधील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला सांगितले होते. शेवटी समन्स नोटीस या दोघांच्या हाती न देता त्यांच्या सह्या घेऊन त्यांना जायला सांगितले होते.








