नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्यात येत्या २६ मार्च रोजी राज्यसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (ता. ११) निवडणूक अर्ज भरला. तर कॉंग्रेसमधून राज्यसभेच्या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार यासाठी अनेक नावांची चर्चा होती. त्यावर आता काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेसाठी हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेसकडून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. दरम्यान, सातव यांच्यासह राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून सातव यांच्यासह मुकुल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे या नेत्यांच्या नावांचा समावेश होता.
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.