
सत्ताधारी सहकार पॅनलला शेतकरी पॅनलचे तगडे आव्हान
जळगाव ( प्रतिनिधी ) – दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगावच्या समिती/संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी (सन २०२६ ते २०३१) रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत अखंड मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर प्रकटनातून दिली आहे.

जिल्ह्यात ३० मतदान केंद्रे; मतदारांसाठी ओळखपत्र बंधनकारक
निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकूण ३० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, धरणगाव आणि एरंडोल या भागांचा समावेश असून, प्रत्येक ठिकाणी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आणि इतर सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १४ पैकी कोणताही एक वैध ओळखपत्र पुरावा सोबत ठेवणे बंधनकारक राहील.
३० नोव्हेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी
मतदान पूर्ण झाल्यानंतर सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतमोजणीसाठी सैनिक कल्याण हॉल, महाबळ रोड, जळगाव (ता. जि. जळगाव) हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
एकूण मतदार किती आहेत?
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार एकूण ३,०३६ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये संस्था सभासद : २,५६२, व्यक्तिगत सभासद: ४७४ आहेत.
प्रत्यक्ष मतदान कोण व किती करू शकतात?
३० मतदान केंद्रांवर नमूद केलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था व इतर सहकारी संस्थांच्या मतदारांची बेरीज केल्यास ती ३,३२३ होते. काही केंद्रांवर यादीतील किंवा ठराव/संस्था निहाय नोंदींमध्ये फरक दिसून येतो; अंतिम मतदार यादीत एकूण ३,०३६ मतदारांची नोंद असल्याचे वृत्त आहे. संचालक मंडळाच्या ज्या जागांवर निवडणूक लढवली जात आहे, त्या-त्या मतदारसंघातील पात्र संस्थांचे ठराव असलेले प्रतिनिधी व संबंधित पात्र सभासदच मतदान करू शकतात. तसेच बँकेच्या २१ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित ९ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे.
मतदान केंद्रांनुसार मतदार संख्या (जाहीर प्रकटनानुसार)









