
पेट्रोल पंपावर शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल लंपास; भडगाव पोलिसांची कारवाई
भडगाव (प्रतिनिधी) : पेट्रोल पंपावर आलेल्या एका व्यक्तीला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना भडगाव येथे घडली होती. या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत भडगाव पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. विशाल संजू सोनवणे (वय २२, रा. भडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भडगाव येथील ए.बी. पेट्रोलियम पेट्रोल पंपावर २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी अरुण शेनपडू पाटील (वय ४८, व्यवसाय मजुरी, रा. ऐकवीरा नगर, भाग २, भडगाव) हे पेट्रोल पंपावर असताना आरोपीने त्यांच्याजवळ येऊन शस्त्राचा धाक दाखविला. त्यानंतर फिर्यादीचा सुमारे १० हजार रुपये किमतीचा रियलमी कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी विशाल संजू सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश बाळासाहेब टाक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.








