
ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
यावल (प्रतिनिधी) : यावल शहराच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख असलेल्या निंबाळकरांच्या किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे समोर आले आहे.

किल्ल्यातील जुने दगडी बांधकाम ढासळत असून, मोठमोठे दगड कोसळून परिसरात दगड-मातीचे ढिगारे निर्माण होत असल्याचे व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे. किल्ल्याची ही अवस्था पाहता या ऐतिहासिक वास्तूच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्षानुवर्षे ऊन, वारा आणि पावसाचा मारा सहन करणाऱ्या या वास्तूची योग्य देखभाल व संवर्धन न झाल्यास उर्वरित बांधकामही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावलच्या इतिहासाशी जोडलेला हा महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. संबंधित पुरातत्त्व विभाग आणि प्रशासनाने तातडीने किल्ल्याची पाहणी करून पडझडीची कारणे शोधावीत, धोकादायक भाग सुरक्षित करावेत तसेच शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धनाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
ऐतिहासिक वारसा डोळ्यांसमोर ढासळत असताना प्रशासन आणखी किती काळ प्रतीक्षा करणार? निंबाळकरांच्या किल्ल्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.








