
भडगाव तालुक्यामध्ये थरार, धुळ्यात उपचार सुरू
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्पावर कामासाठी जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी बंदुकीतून तीन राउंड फायर करत घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जयेश पवार (वय २२, रा. कजगाव, ता. भडगाव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कजगाव परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहे. संध्याकाळच्या सुमारास कामावर जात असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. गोळी लागल्याने जयेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांना गोळीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. गंभीर जखमी अवस्थेत जयेशला तातडीने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा अधिक तपास भडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.
जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरातही गेल्या आठवडाभरात गोळीबाराच्या तीन ते चार घटना घडल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर वचक निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.








