
टेम्पो ट्रॅव्हलरचा मध्यरात्री अपघात; ६ जण जखमी, मृतांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांसह दोन चिमुकल्यांचा समावेश
धुळे (प्रतिनिधी) – राजस्थान राज्यातील कोटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण वाहन अपघातात धुळे जिल्ह्यातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य ६ जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.


कोटा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फोर्स ट्रॅव्हलर (टेम्पो ट्रॅव्हलरसदृश) वाहन क्रमांक MH-18-CL-3005 चा राजस्थानमधील कोटा येथे रात्री १२ वाजेच्या सुमारास अपघात झाला. या वाहनातून एकूण १५ प्रवासी प्रवास करीत होते. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, यामध्ये ९ जणांचा जागीच अथवा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृतांचे मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये उषा सज्जन पवार (वय ६०), सुशीला बाबूलाल पवार (वय ६५), कैलाश भगवान पवार (वय ४५), सान्वी गणेश पवार (वय ६), सज्जन दौलत पवार (वय ७०), अनीता कैलाश पवार (वय ४०), बाबूलाल दौलत पवार (वय ७३), जानवी कैलाश पवार (वय १३) आणि माधवी गणेश पवार (वय ४५) यांचा समावेश आहे. हे सर्वजण धुळे शहरातील शांतिगीत नगर, नवनाथ नगर तसेच शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या अपघातात मनीषा शरद पवार (वय ४१), मयुरी शरद पवार (वय २०), जगदीश कैलाश पवार (वय १०), श्रीजीत गणेश पवार (वय ४), शरद बाबूलाल पवार (वय ४५) आणि गणेश सज्जन पवार (वय ३२) हे सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना कोटा येथील स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील आणि परिचित परिवारातील अनेक सदस्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजस्थानमधील कोटा येथे घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे.
अपघाताचे नेमके कारण आणि मृत्यूंचे अधिकृत तपशील याबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.








