
धरणगावातील संजयगांधीनगर परिसरातील घटना; अजय मोरावकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव शहरातील संजयगांधीनगर परिसरात घरासमोर ठेवलेली लाकडाची बल्ली उचलल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३९ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. किरण धनराज बोरसे (वय ३९, रा. विंचूर, ता. जि. धुळे) असे मृत तरुणाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजय रमेश मोरावकर (रा. संजयगांधीनगर, धरणगाव) याच्या घरासमोर असलेली लाकडाची बल्ली किरण बोरसे याने उचलली होती. याच कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात किरण याच्या उजव्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात किरण गंभीर जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, उजव्या पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू असताना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी किरण बोरसे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ९१/२०२६ च्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेबाबत फिर्याद दाखल करण्यात आली असून धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी अजय मोरावकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन पुढील तपास करीत आहेत








