जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीधर अभियांत्रिकी विद्यार्थी भूषण शांताराम घुले यांची भारतातील प्रतिष्ठित विमाननिर्मिती व संरक्षण क्षेत्रातील संस्था हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), बेंगळुरू येथे कनिष्ठ कार्यकारी अभियंता (Junior Executive Engineer) पदावर निवड झाली आहे. ही निवड महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

भूषण याने महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान केवळ शैक्षणिक ज्ञानावर भर न देता, व्यावसायिक कौशल्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी AutoCAD आणि Creo या संगणकाधारित अभियांत्रिकी डिझाइन सॉफ्टवेअरचे अभ्यासक्रम पूर्ण करून डिझाइन इंजिनिअरिंग क्षेत्रातील कौशल्य विकसित केले. या प्रशिक्षणामुळे त्यांना CAD आधारित डिझाइन क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान व व्यावहारिक कौशल्य प्राप्त झाले. शैक्षणिक ज्ञानासोबत उद्योगाभिमुख कौशल्यांची जोड दिल्यामुळे त्यांच्या व्यावसायिक जडणघडणीला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
या उल्लेखनीय यशाबद्दल भूषण घुले याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विजयकुमार वानखेडे (प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी), डॉ. तुषार कोळी, (अधिष्ठाता व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख), डॉ. किशोर महाजन (अधिष्ठाता IPR), डॉ. पंकज बोंडे आणि प्रा. भालचंद्र सुरवाडे (T&P समन्वयक) उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील व्यवस्थापन व प्राध्यापकांनी भूषण यांच्या मेहनतीचे, चिकाटीचे, कौशल्यविकासाचे आणि यशाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक विकासासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी भूषण याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उपक्रमांवर सातत्याने भर दिला जातो. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत.
भूषण याची HAL सारख्या प्रतिष्ठित संस्थेत झालेली निवड ही या प्रयत्नांचे फलित आहे.
गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग परिवारातर्फे भूषण शांताराम घुले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून HAL, बेंगळुरू येथे त्यांच्या उज्ज्वल, यशस्वी आणि प्रगतीशील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत!








