बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांचा डल्ला; अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शामनगर परिसरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शामनगर परिसरातील प्लॉट क्रमांक २७, गट क्रमांक १६१/१ ब येथे किरण नंदकिशोर वासेवाय (वय ५२) यांचे राहते घर आहे. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेली १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी किरण वासेवाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरू
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









