जामनेर मतदारसंघातून तुकाराम विठोबा निकम यांची उमेदवारी माघार; ‘गिरीश भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत’ म्हणत दिला पाठिंबा!
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तुकाराम विठोबा निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत मंत्री गिरीश महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. आपण गिरीश भाऊ यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

जिल्हा बँकेच्या जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रघुनाथ पाटील आणि तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला होता. या निर्णयाला आव्हान देत त्यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती. मात्र, तेथेही त्यांची हरकत फेटाळण्यात आली.
त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात मंत्री गिरीश महाजन आणि तुकाराम विठोबा निकम हे दोन उमेदवार शिल्लक होते. मात्र, आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी निकम यांनी गिरीश महाजन यांना पाठिंबा जाहीर करत आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड मानली जात आहे.








