मुद्देमाल हस्तगत करून आरोपीला अटक
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील हिरापूर रोडवरील इच्छादेवी मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात चाळीसगाव शहर पोलिसांना यश आले आहे. मंदिरातील पितळी घंटा, कलश आणि पूजेचे साहित्य चोरणाऱ्या २२ वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


मंदिरात पुजारी म्हणून संजू महाराज गोपालदास (वय ५२) हे मंदिर परिसरातील खोलीत वास्तव्यास आहेत. १३ सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्याने मंदिरातील घंटा आणि इतर पितळी पूजेच्या वस्तू असा सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी २६ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शन आणि सूचनांनुसार, गुन्हे शोध पथकाने तपासादरम्यान गोपाल सुरेश माचे (वय २२, रा. ओस्वाल हॉस्पिटलजवळ, चाळीसगाव) याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी केली.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये कलश पितळी घंटा व इतर साहित्याचा समावेश आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मंदिरातील चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.









