४ नोव्हेंबरच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी; अखिल स्तरीय महा-ई-सेवा व आधार केंद्र संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात नवीन ‘आपले सरकार’ व ‘महा-ई-सेवा’ केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात तातडीने रद्द करावी, तसेच ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी अखिल स्तरीय महा-ई-सेवा व आधार केंद्र संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन सादर केले.


संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पढार आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष जगदीश तापडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिका तसेच लोकायुक्तांच्या आदेशानुसार नवीन केंद्रांची जाहिरात प्रसिद्ध करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय नाशिकच्या विभागीय आयुक्तांनीही २० ऑगस्ट २०२६ रोजी जाहिरात रद्द करण्याबाबत कळविले होते, असा दावा संघटनेने निवेदनात केला आहे.
असे असतानाही संबंधित जाहिरात प्रसिद्ध करून निकाल जाहीर करण्यात आल्याने न्यायालयाच्या निर्देशांचा आणि लोकायुक्तांच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे नवीन केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती तातडीने रद्द करून जाहीर झालेल्या निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांच्या तहसीलदारांना संबंधित जाहिराती रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नकुल बारी, खजिनदार राजू सोनवणे, शहराध्यक्ष मनोज निंबाळकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.








