कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय; १५ डिसेंबरपासून पाणी सोडणार
जळगाव (प्रतिनिधी) – गिरणा धरणातून जामदा उजवा व डावा कालव्याला बिगर सिंचनासाठी पाण्याचे एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गिरणा नदीला पिण्याच्या पाण्यासाठी एकूण तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय आज जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मंत्री महोदय, आमदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, गिरणा धरणातून जामदा उजव्या कालव्याला १५ डिसेंबरपासून १५ दिवस, तर डाव्या कालव्याला ३५ दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. बिगर सिंचनासाठी मिळणाऱ्या या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज तातडीने भरावेत, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, गिरणा नदीला पिण्याच्या पाण्यासाठी एकूण तीन आवर्तने मंजूर करण्यात आली असून, पहिले आवर्तन १५ डिसेंबर रोजी सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली.
शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशेवर पाणी?
यंदा पावसाळ्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत गिरणा धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने मिळतील, अशी अपेक्षा गिरणा काठच्या शेतकऱ्यांना होती.
मात्र, भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून कालवा सल्लागार समितीने मर्यादित पाणी आवर्तनांचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले असून, या निर्णयामुळे गिरणा काठासह परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
खरीप हंगामात नुकसानीचा सामना केल्यानंतर रब्बी हंगामासाठी पाण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना आता मर्यादित आवर्तनांवर समाधान मानावे लागणार असल्याने प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









