जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
जळगाव:(प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव येथे केलेल्या एका मोठ्या कारवाईत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वर्ग १ चे उपविभागीय अधिकारी सतिष मन्सुलाल शिसोदे यांच्या घरझडती व बँक लॉकरमध्ये एकूण ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांचा अघोषित मालमत्ता व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


या प्रकरणाची थोडक्यात हकिगत अशी आहे की, संशयित लोकसेवक सतिष मन्सुलाल शिसोदे (वय ५५, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, आदर्श नगर, जळगाव) यांच्यावर दिनांक २ नोव्हेंबर रोजी यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसीबीच्या पथकाने केलेल्या घरझडती आणि बँक लॉकरच्या तपासात मोठ्या प्रमाणावर संपत्ती उघडकीस आली आहे. घरझडतीमध्ये ७ लाख ९७ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम, आदर्श नगर येथील ४५ लाख रुपये आणि ६५ लाख रुपये किमतीची दोन घरे तसेच २४ लाख ३९ रुपयांच्या घरातील अंदाजित वस्तू असा एकूण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे.
याशिवाय जळगाव सहकारी बँकेच्या लॉकरमध्ये ३ कोटी ५१ लाख ८१ हजार १५३.१० रुपयांचे २५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे, पट्टे, चेन, पेंडंट, बांगड्या व इतर साहित्य, १९ लाख ५३ हजार ९९१.३० रुपयांचे ११६३३.७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व भांडी, तसेच ३ लाख ५५ हजार २८६ रुपये किमतीचे १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिने असा एकूण ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३०.४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रोख रक्कम, घरे, सोन्या-चांदीचे व प्लॅटिनमचे दागिने मिळून एकूण ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची संपत्ती तपासात समोर आली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे आणि पथकाने ही धडक कारवाई पार पाडली आहे. भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे संपर्क साधावा किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर व ७५८८६६१०६४ या व्हाट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.








