जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; बीडीडीएस पथकाकडून तपासणीत काहीही संशयास्पद नाही

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर तातडीने सतर्क होत पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण न्यायालय परिसरात धाव घेतली.
धमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ‘बीडीडीएस’ (BDDS) पथकाकडून जिल्हा न्यायालय तसेच संपूर्ण न्यायालय परिसरात कसून ‘एएससी’ (ASC – घातपात विरोधी तपासणी) मोहीम राबवण्यात आली. पथकाने श्वान पथकाच्या मदतीने न्यायालयाचा प्रत्येक कोपरा आणि परिसर पिंजून काढला.
मात्र, सखोल तपासणीनंतर पोलिसांना आणि बीडीडीएस पथकाला कोणतीही संशयास्पद वस्तू, स्फोटक किंवा संशयास्पद हालचाल आढळून आलेली नाही. ही धमकी अफवा किंवा निव्वळ बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालय प्रशासनाने आणि नागरिकांनी मोठा सुटकेचा श्वास घेतला आहे. पोलीस प्रशासनाकडून संबंधित ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.









