पोलिसांची सतर्कता आणि ग्रामस्थांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला; सुमारे २७ किलो सोने, ११ लाखांची रोकड आणि दोन दुचाकी जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न जळगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने हाणून पाडला आहे. पोलिसांची सतर्कता आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे अवघ्या काही तासांत या दरोड्याचा कट उधळण्यात आला. या प्रकरणात चार सराईत दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

नेमका काय घडला प्रकार?
दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.४५ ते ३.१५ वाजेच्या सुमारास हेल्मेट व तोंडाला मास्क लावलेल्या चार आरोपींनी भोकर येथील एसबीआय बँकेत प्रवेश केला. आरोपींनी बँकेतील कर्मचाऱ्यांना धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेचे सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी आरोपींचा प्रतिकार केला. यावेळी आरोपींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

दरम्यान, बँकेतील घडामोडींची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. भोकर महिला पोलीस पाटील यांचे पती संभाजी पवार यांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवली. तसेच ग्रामस्थांनीही पोलिसांना सहकार्य केले. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला.
चार आरोपी जेरबंद; गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
या कारवाईत अंकुश तुळशीराम पवार, गजानन राजेंद्र पवार, शंकर रमेश जासक आणि अंकुश श्रावण चव्हाण या चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारी नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.

३६ कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे.,रोख रक्कम : ११ लाख २६ हजार ५०० रुपये.,सोन्याचे दागिने : सुमारे २७ किलो (अंदाजे किंमत ३६ कोटी ३६ लाख २३ हजार रुपये).,पल्सर २२० दुचाकी.,होंडा शाईन १०० दुचाकी.,अशा प्रकारे एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि या दरोड्याच्या कटामागील इतर संभाव्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
पोलीस पथकाच्या कामगिरीचे कौतुक
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका व धरणगाव पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. पोलिसांच्या तत्परतेला स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने बँकेवरील मोठा दरोडा टळला. या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.









