अज्ञात चोरट्याचा प्रताप; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घराबाहेर उभी केलेली बजाज कंपनीची ऑटो रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आझादनगर परिसरात राहणारे मोहम्मद फैजान शेख अतिक (वय २५) हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. दि. २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी त्यांची बजाज कंपनीची ऑटो रिक्षा (क्रमांक एमएच १९ सीडब्ल्यू ६६२६) पाळधी येथील भावाच्या घराबाहेर उभी केली होती. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रिक्षा घेण्यासाठी बाहेर आले असता, घराबाहेर उभी केलेली रिक्षा जागेवर दिसून आली नाही.
परिसरात तसेच आजूबाजूला शोध घेतला असता रिक्षा मिळून आली नाही. अखेर अज्ञात चोरट्याने सुमारे ५० हजार रुपये किमतीची रिक्षा चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.या प्रकरणी दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र युवराज पाटील करीत आहेत.









