जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खडसे कुटुंबाचे स्वीय सहाय्य्क योगेश कोलते मैदानात

मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल; एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांना दहा वर्षांच्या कार्यकाळामुळे माघार
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खडसे कुटुंबाच्या वतीने योगेश कोलते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी आपला अर्ज सादर केल्याने या मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आमदार एकनाथराव खडसे आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जिल्हा बँकेत सदस्य म्हणून प्रत्येकी दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नसल्याने खडसे कुटुंबाच्या प्रतिनिधीच्या स्वरूपात योगेश कोलते यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. अशा परिस्थितीत खडसे कुटुंबाच्या वतीने योगेश कोलते यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









