अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

व्हॉइस क्लिप व्हायरल करून बदनामीची धमकी; न्यायालयाकडून २० हजारांचा दंडही
जळगाव, प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधांची मोबाईल व्हॉइस क्लिप इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पवन सोनवणे (वय १९) याला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयाने आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना १८ जुलै २०१९ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जळगाव तालुक्यात घडली होती.
गिरणा नदीपात्रात अत्याचार
पीडित अल्पवयीन मुलीची बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपीने तिला गावाबाहेरील गिरणा नदीपात्रात वाळूवर नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आठ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची
या गुन्ह्याचा तपास अधिकारी गणेश चव्हाण यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता आणि फिर्यादी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता तथा विशेष सरकारी वकील चारुलता राजेंद्र बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि विशेष सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ३ व ४ अन्वये सात वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.









