नशिराबादजवळ डंपर-ट्रकची समोरासमोर धडक; चालकाचा मृत्यू

मकरा फटाक्यांसमोर भीषण अपघात; तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प
जळगाव, प्रतिनिधी : नशिराबादजवळ राष्ट्रीय महामार्गावर मकरा फटाक्यांसमोर गुरुवारी (ता. २९) रात्री दहाच्या सुमारास राखेचा डंपर आणि सोयाबीन वाहून नेणाऱ्या ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकचालक रमेश चंद्र यादव (वय ५६, रा. उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला, तर डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) गंभीर जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर सुमारे तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला.
चालकाला क्रेनच्या मदतीने बाहेर काढले
गुजरातहून नागपूरकडे सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एमएच ४० बीजी ६२८७) रमेश चंद्र यादव चालवत होते. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास मकरा फटाक्यांसमोर दीपनगर येथून जळगावकडे जाणाऱ्या राखेच्या डंपरची (क्रमांक एमएच १५ जीडब्ल्यू ३८७९) ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ट्रकचालक यादव केबिनमध्ये अडकून पडले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक सतीश बेलसरे, त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर क्रेनच्या साहाय्याने ट्रक हलवून सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर यादव यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
डंपरचालक गंभीर जखमी
या अपघातात डंपरचालक मुक्तचर अली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे तीन तास वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.








